फॉलोअर

रविवार, २७ एप्रिल, २०२५

छत्रपती शिवरायांचा शिल्पांकित झालेला सत्य इतिहास



#मराठा आणि मल्लम्मा देसाई संघर्ष, बेलावाडी, कर्नाटक

          राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी पूर्व तयारी कारून छत्रपती शिवाजी महाराज ६ ऑक्टोबर १६७६ रोजी रायगडावरून मोहिमेला बाहेर पडले आणि ११ मे ते 9 जून १६७८ मधे महाराज रायगडावर परतले. अवघ्या दीड वर्षातच महाराजांनी आपले दक्षिण दिग्विजयाचे लक्ष साध्य केले.

          मोहिमेवरून परतताना मराठयांचा आणि बेलावाडीची राणी (regent) मल्लम्मा देसाई यांच्यात संघर्ष झाला. साधारण जानेवारी, फेब्रुवारी १६७८ मधे घडलेल्या या घटनेच्या संदर्भाने अनेक भाकड कथा नंतरच्या काळात जोडल्या गेल्या, त्याचा विचार येथे करणे महत्वाचे आहे. या कथांमध्ये एकसमान महत्वाचा भाग म्हणजे मल्लम्मा देसाईने मराठा सैन्याचा पराभव केला शेवटी महाराजांना माफी मागावी लागली वैगरे-वैगरे. या अनुषंगाने चिकित्सक विचार करता लक्षात येते, प्रामुख्याने कन्नड इतिहासकारांनी आणि आपल्याकडीलही काही मोजक्या लेखकांनी मल्लम्माचे महत्व वाढविण्यासाठी हा सगळा खटाटोप केलेला आहे. त्याला कुठलाही ठोस पुरावा अथवा संदर्भ दिलेला नाही. “एका स्त्रीने महाराजांचा पराभव केला” ही गोष्ट अधोरेखित करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेण्याचा हा मूळ उदयोग आहे. याची सुरुवात होते मुंबई विद्यापीठाच्या कन्नड विभागाने डॉ. के.एन. चिटणीस यांनी इ. स. १९८९ मधे संपादित केलेले आणि मराठीत प्रकाशित केलेल्या “शिवाजी-मल्लम्माजी समरोत्सव” या पुस्तकापासून. ज्याचे वर्णन त्यांनी "१८ व्या शतकाच्या सुरुवातीचे हस्तलिखित" असे केलेले आहे. हे हस्तलिखित शेषो श्रीनिवास मुतालिक यांनी शिवरायांच्या सूनबाई आणि तत्कालीन मराठा सम्राज्याच्या छत्रपती महाराणी ताराबाई यांनी आयोजित केलेल्या शिवरायांवरील चरित्र स्पर्धेसाठी लिहिले असल्याचा दावा केलेला आहे. आणि जिथे त्यांना तिसरे स्थान मिळाले असेही म्हटले आहे. या कथेत सोंडा येथील मधुलिंग नायक यांची मुलगी आणि बेलावाडी येथील ईशाप्रभू यांची पत्नी मल्लम्माचे वर्णन आहे. शिवरायांच्या कर्नाटक मोहिमेदरम्यान, त्यांच्या सैनिकांनी बेलावाडीतील गायी जप्त केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे संघर्ष झाला ज्यामध्ये ईशाप्रभू गंभीर जखमी झाले. मल्लम्माने प्रतिकार सुरू ठेवला, शिवाजी आणि त्यांच्या काही उर्वरित अनुयायांवर हल्ला केला. कथेत असे म्हटले आहे की, शिवरायांनी आपल्या जीवाची भीती बाळगून मल्लम्माची क्षमा मागितली जी तिने मान्य केली” .. वरील हस्तलिखिताची पडताळणी करताना हस्तलिखिताची मूळ कन्नड-मराठी प्रत ज्यावरून मराठी प्रत प्रकाशीत केली ती हरवल्याचे दिसून येते आणि महत्वाचे म्हणजे इ. स. १७१७ मध्ये मल्लम्माच्या मृत्यूनंतर बनवलेली कन्नड लिपीतील मराठी प्रत बेलावाडी येथे सापडल्याचे वृत्त आहे. डॉ. चिटणीस यांनी या मजकुराची आधुनिक भाषा, प्रक्षेपणे आणि शिवरायांवर मल्लम्माच्या विजयाचा खोटा दावा मान्य केला आहे. तरीही हे घडले असावे अशी भ्रामक कल्पना पसरवून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काहीजन करत आहेत. जेष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे म्हणतात “हे हस्तलिखित आधुनिक बनावटीचे आणि ते श्री-शिवदिग्विजय कालक्रमानुसार (chronicles) साम्य असल्याचे लक्षात घेऊन ते १८१८ पूर्वी लिहिले जाऊ शकत नाही. याव्यतिरिक्त समकालीन मराठी वाक्यांची उपस्थिती सूचित करते की ते १९०० नंतर लिहिले गेले असावे” छत्रपती शिवरायांनी तिन्ही पादशाह्या गारद करून स्वराज्य उभे केले त्यानंतर स्वराज्याभिषेक करवून संपूर्ण दक्षिणेतील जवळ-जवळ सर्वच छोटे-मोठे मंडलिक राजे, संस्थानिक, मोठ्या सरदारांना आपल्या अधिपत्याखाली आणून दक्षिणदिग्विजय केला, त्यांच्याकडे २५००० घोडदळ आणि ४०००० पायदळ असलेली प्रचंड मराठा सेना होती. असे असताना बेलावाडीत छोटया भुईकोटात राज्य करणारी जेमतेम ५००० सैन्य असलेली मल्लम्मा देसाई महाराजांशी सामना करू शकेल का हा प्रश्न आहे ? उत्तर ते तिला शक्यच नव्हते. मराठी साहित्याचा विचार करता लक्षात येते महाराज नेहमी मोहिमेवर जाताना आपल्या सैन्याची एक निवडक तुकडी पुढे पाठवीत, ती शत्रूंच्या प्रदेशात घुसून धुमाकूळ घालीत. आणि जे संस्थानिक, पाळेगार, पादशाहांना नियमित खंडणी देत होते त्यांना ताकीद देवून त्यांचा प्रदेश लुटत असत. हा युद्धनीतीचा एक होता. 

          असाच अजून एक प्रसंग ‘तारीख-इ-शिवाजी’ या बखरीत आणि शिवाजी अँड हिज टाईम्स’ या अविश्वसनीय पुस्तकाचा आधार घेत, ‘छत्रपती शिवराय’ आणि ‘बेलावाडीची राणी मल्लामा’ यांच्यातील युद्धाच्या अनुषंगाने सांगितला जातो तो म्हणजे “मराठयांचे सेनानी सखोजी गायकवाड यांनी त्या राणीवर अत्याचार केला” निर्लज्जपणाचा कळस म्हणजे काही बाजारू लेखक, कथाकारांनी हीच रेघ पुढे ओढत कळस गाठला आहे. शिवरायांनी या गैरकृत्यासाठी साखोजीचे डोळे काढून कठोर शिक्षा केल्याचे म्हटले आहे. या महामुर्खांना एवढही भान नाही कि, शिवरायांच्या स्वारीत, प्रत्यक्ष शिवरायांच्या सोबत असताना एखादा मावळा अथवा सेनापती एका स्त्रीवर अत्याचार करू करेल का ? एकतर त्यांनी शिवचरित्राचा नीट अभ्यास केलेला दिसत नाही, नाहीतर मराठयांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक बेलावाडीच्या युद्धदरम्यान मराठा सेनापतीने राणीसोबत गैरवर्तन केले असा जो उल्लेख आहे तो “The Rebellious Rani of Belavadi and Other Stories by Basavaraj Naikar” आणि “Belawadi Mallamma by Hardmod Carlyle Nicolao” सारख्या इंग्रजी पुस्तकात आणि सर्वच कन्नड साहित्यात सांगितला जातो परंतू त्यात या सैनिकाचे नाव दादाजी रघुनाथ बेडकर दिलेले असून तेथे कुठेही सखोजी गायकवाडचा उल्लेखच नाही. 

          एका समकालीन इंग्रजांच्या प्रत्रात म्हटले आहे की “शिवाजी सध्या एका किल्ल्याला वेढा घालत आहेत जिथे मुघलांच्या,  विजापुरच्या सर्व शक्तींपेक्षाही जास्त अपमान सहन करावा लागला आहे आणि ज्याने इतकी राज्ये जिंकली आहेत तो या महिलेला कमी करू शकत नाही” (Factory Records, Surat, p. 107) वरील विधान इंग्रजांनी का केले असेल याचे उत्तर त्याघटनेतच दडलेले आहे. महाराजांच्या दैदिप्यमान यशस्वी चरित्राचा अभ्यास विचारात घेवून मल्लम्माने दिलेल्या लढयाकडे पहिले तर एका स्त्रीने, एका छोटया कोटाचा आधार घेत तब्बल २७ दिवस मराठा सैन्याशी झुंझ दिली, ही गोष्ट परकियांच्या दृष्टीने महाराजांचा अपमान झाल्यासारखीच होती. म्हणूनच त्यांनी वरील विधान पत्रात केलेले आहे. ज्यांनी बलाढय पादशाह्यांना पाणी पाजून, संपूर्ण दक्षिण आपल्या अधिपात्याखाली आणले त्या शिवरायांना एका स्त्रीशी २७ दिवस लढाव लागले म्हणून त्यांना स्वतःला सुद्धा ही गोष्ट अपमानास्तव वाटली असणार हे साहजिक आहे. परंतू दोष तिचा होता तिचे लहान राज्य हे आदिलशाहीतील मांडलिक राज्य होते. (Bilgi, Jamkhindi, Yadvad was Territory of Adilshahi - Busatini-us-Salatini, p. 521) तिने सुरवातीलाच स्वराज्य कार्यात सामील व्हायला पाहिजे होते परंतु प्रतिशोधापायी तिने मराठा काफिल्यावर हल्ला करून लुटमार केली. त्यामुळे तिला तिचे परिणाम भोगावे लागले, म्हणून मराठी बखरींत तिला शिक्षा केली म्हटले आहे. परंतू वास्तवात महाराजांनी तिला माफ करून तिचे राज्य तिला परत दिलेच शिवाय मुलाला मांडीवर घेवून त्याच्या पालन-पोषणाची जबाबदारीही स्विकारली, हे त्या जिवंत शिल्पातून दिसून येते.

          खरी हकीगत अशी आहे की, महाराज जेव्हा दक्षिणेतून विजय संपादित करत कोप्पल, गदग-लक्ष्मेश्वरमार्गे संपगाव याठिकाणी आले. त्याआधी त्यांनी आपले  सेनापती दादाजी रघुनाथ बेडकर याला एक तुकडी देवून पुढे पाठविले होते. त्यांनी गदग परिसरात धुमाकुळ घातला कारण हा प्रदेश विजापूरच्या आदिलशाहाच्या ताब्यात होता. बंकापुरला आदिलशहाचे दक्षिणेकडील महत्वाचे लष्करी केंद्र होते. त्यामुळे बंकापुर ते विजापूरच्या बरोबर मधेच असणारा आणि बाजी घोरापाडेच्या मुधोळ संस्थानच्या जवळ असणारा बेलावाडीचा प्रदेश सुद्धा साहजिकच विजापूरराज्यात समाविष्ट झालेला होता. तेथील मांडलिक आदिलशाहाला खंडणी देत होते. त्यामुळे मल्लम्मा आणि मराठयांचा संघर्ष झाला यात नवल नाही ! त्यात मल्लम्मानी जोरदार प्रतिकार केल्याने मराठयांना काहीसे मागे सरावे लागले असावे असे कागदपत्रातून दिसते. मल्लम्मा देसाईने महाराजांच्या सैन्यातील बाजारबुणग्यांवर हल्ला करून काही समान-सुमान बैल लुटून नेले. मुख्य सैन्य घेवून महाराज जेव्हा संपगावात पोहचले तेव्हा ही खबर कळताच त्यांनी बेलावाडी कोटाला वेढा घातला. मल्लम्मा देसाईने २७ दिवस हा कोट लढविला शेवटी अन्न-धान्यादि रसद आणि पाण्याचा गंभीर प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाला. त्यानंतर ती महाराजांना शरण गेली. ही लढाई मोकळ्या मैदानावरची नव्हती आणि कोट आतून कोण लढवतोय याचीही कल्पना महाराजांना नव्हती. जेव्हा महाराजांना कळाले कि, एका स्त्रीने, स्त्रियांचे लष्कर सज्ज करून आपल्या सैन्याशी झुंज दिली तेव्हा त्यांना तिचे कौतुक वाटले, त्यांनी मल्लम्माला क्षमा करून तिचा प्रदेश तिला परत केला आणि तीच्या मुलालाही मांडीवर घेवून तिचे राज्य संरक्षणाची जबाबदारी स्विकारली. याचे ऋण म्हणून मल्लम्मा देसाईने महाराजांची स्मृती म्हणून त्यांच्या हयातीत असताना त्यांचे एक शिल्प बनवून घेतले. त्या शिल्पात वरील घटनेचा सारांश शिल्पारुपात कोरलेला आहे.

          या शिल्पाचे खाली-वर असे दोन भाग आहेत. त्यातील वरील भागात छत्रपती शिवाजी महाराज घोडयावर बसलेले आहेत. त्यांच्या उजव्या हातात म्यानातून बाहेर काढलेली खंडया तलवार आणि डाव्या हातात ढाल आहे. मावळ्यांनी डोक्यावर छत्र, चामर धरलेले असून उजव्या हाताला खाली म्यान धरलेला शिपाई आहे. घोडयाच्या पुढे चालणाऱ्या मावळ्याच्या उजव्या हातात पाण्याची सुरई असून डाव्या हातात निशाणीचा भाला आहे. या सर्व मावळ्यांच्या डोक्यावर शिंदेशाही पगडी आहे जी मराठा सैन्याचे प्रतिक आहे. या शिल्पाचे वैशिष्टये म्हणजे शिल्पातील कमानीवर दहा पोपट रांगेने कोरलेले आहे आणि महाराजांच्या घोडयाबरोबर एक कुत्रा चालताना दाखाविला आहे, तो सध्या चर्चेचा आणि संशोधनाचा विषय झालेला आहे. त्याबाबत खुलासा करणे गरजेचे आहे. याचे कारण म्हणजे धार्मिक वाडमयमधे पोपट हा मीनाक्षीचे वाहन असून तो प्रेमाचे प्रतिक म्हणून दाखविला जातो आणि कुत्रा हा खंडोबाचे प्रतिक आहे. बेलावाडी आणि सभोवतालच्या प्रदेशावर वीरशैव संप्रदायाचा प्रभाव असून लिंगायत समाजही मोठया प्रमाणात आहे. विशेष म्हणजे खंडोबाची अनेक मंदिरे आसपासप्रदेशात आहेत. उदाहरण दयायचे झाल्यास मैलारा लिंगा, धारवाड जिल्हा; मंगळसुली, बेळगाव जिल्हा; देवरगुड्डा, राणेबेन्नूर तालुका, हावेरी जिल्हा; मन्नमैलर किंवा मेलार (मायलारा), बेल्लारी; मेलरलिंगेश्वर मंदिर, मैलापुरा, यादगीर इत्यादी.  या सर्व गोष्टी विचारात घेवून शिल्पाकडे नीट पहिले तर छत्रपती शिवाजी महाराज हे खंडोबाचे अवतार वाटतात, त्यामुळेच कदाचित मल्लम्मा देसाईने कुत्र्याचे शिल्प कोरलेले असावे याची दाट शक्यता आहे. 

      


    शिल्पाच्या खालच्या भागात मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले असून ते मल्लमाच्या मुलाला डाव्या मांडीवर बसवून उजव्या हाताने त्याला पाणी पाजत आहेत त्यांच्या हातात पात्र आहे. (बऱ्याच लोकांचा समज आहे कि, ते वाटीने दुध पाजत आहेत परंतू शिल्पात अनेक ठिकाणी सेवकांच्या हातात पाण्याची सुरईच दाखविलेली आहे.) राणी मल्लम्मा देसाई उजव्या बाजूला उभी आहे. शिल्पात डाव्या हाताला तिची दासी पाण्याची सुरई, आणि वाटी घेवून महाराजांकडे देत आहे. डाव्या बाजूला एक स्त्री हातात धनुष्य घेवून सज्ज असलेली दाखविलेली असून उजव्या बाजूला एक मावळा हातात पाण्याची सुरई घेऊन उभा आहे. 

          धारवाडपासून १२-१३ किलोमीटर उत्तरेकडे असणाऱ्या यादवाड गावातील हनुमान मंदिरात आपणास हे शिल्प पहावयास मिळते. आज या शिल्पाला भेट दिल्यावर त्याची दुरावस्था पाहून माझे मन खिन्न झाले. आपण लंडनला, परदेशात जावून महाराजांच्या वस्तू आणण्याचा दावा करतो, त्यांचे गड-किल्ले संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो मग महाराजांचा जाज्वल इतिहास सांगणारा त्यांच्या हयातीतील असणाऱ्या शिल्पाकडे दुर्लक्ष का करतोय ? काही शिवप्रेमी आणि संघटना यासाठी प्रयत्न करत आहेत ... महाराजांचे हे एकमेव असणारे पहिले शिल्प संरक्षित करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा आणि आपणही सर्वांनी याची दखल घेवून आपापल्या परीने उपाययोजना करायला हवी ही विनंती..!                                     

                                                                                                                             लेखक - अमर दांगट

संदर्भ ग्रंथ –

जेधे शकावली

९१ कलमी बखर

चिटणीस बखर

तारीख-इ-शिवाजी

बेलवाडी संस्थान इतिहास

तुरुकारी पंचमरा इतिहास

शंकर भट्टरू लिखित शिववंश सुधारनव

Busatini-us-Salatini

English Record on Shivaji

Shivaji and His Time

House Of Shivaji and Karnataka

Shivaji-Mallamma Samarotsava (marathi)

सोमवार, ३ जून, २०२४

 श्रीविठ्ठलमूर्ती लपविणे आणि पहिले शाहु छत्रपतींची सनद !

श. २० वैशाख शुद्ध नवमीस (२३ एप्रिल १६९४) रोजी छत्रपति राजाराम महाराजांनी एक अभयपत्र व एक आज्ञापत्र काढले त्यांवरून असें दिसतें कीं, मुगलांचा ज्या ज्या वेळीं पंढरपुरास त्रास होई तेव्हां तेव्हां विठ्ठलाची मूर्ति पंढरपूरजवळच्या देगांव या गावात लपवून ठेवीत. मराठा मुगल संघर्षात महत्वाच्या ठिकाणी वारंवार उपद्रव उत्पन्न होई त्यामुळे उपद्रव झालाच तर देवाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनें म्हणून हीं पत्रें आहेत. या पत्रांच्या अनुरोधानें मराठा सेनापति संताजी घोरपडे यांनी श. १६१७ आपाढ वद्य ९, ( १६९५ जुलै २४) रोजीं उपर्युक्त गावास कोणत्याही प्रकारें उपद्रव न देण्यावद्दल आणि कोणी दिला तर त्याचें पारिपत्य करण्यावद्दल लढाईस सदा तत्पर असलेल्या घोडदळास (पागेस) आज्ञा केली आहे. श. १६१७ आश्विन शुद्ध पंचमी (१६९५ ऑक्टोवर २) ला पंढरपूरच्या सर्व गांवकऱ्यांनी लिहून दिलेलें एक पत्र आहे. त्यावरून असे दिसतें कीं, बडव्यांनीं मुगल परचक्राच्या धामधुमीमुळे एकदां मूर्ति लपवून ठेवण्यासाठीं देगाव येथें नेली असतां देगावकरांनीं देव सर्व पंढरपूरकरांचा आहे तर सर्व पंढरपूर गावानें विनंति केल्याखेरीज आम्ही मूर्ति ठेवून घेत नाहीं असा आक्षेप घेतला. तेव्हां देव वडव्यांचा असें समस्त पंढरपूरकरांनीं लिहून दिल्याचें हें पत्र आहे. यामुळे सर्वांच्या विनंतीवरून मूर्ति देगावांत ठेविली गेली. पुढे धामधूम शांत झाल्यावर वडवे मूर्ति परत पंढरपुरास नेऊं लागले असतां देगावकरांनीं मूर्ति पोंचल्याची पावती मागितली. तेव्हां प्रल्हादवुवा, गोपाळ विठ्ठल इत्यादि सात बडव्यांनीं श. १६२१ कार्तिक शुद्ध प्रतिपदेस (१६९९ ऑक्टोवर १३) रोजी पावती दिली त्यानंतर ते मूर्ति घेऊन गेले. ( संदर्भ - पढरपूर संशोधन मंडळ - वि. गो. वडवे यांजकडील कागद. ; विश्वनाथ गोपाळ बडवे यांचे कागद )
मुगलांच्या मुर्तिभंजनाच्या धाकामुळे अनेक ठिकाणच्या मूर्ति वर्षानुवर्षं लपवल्या गेल्याचेही दाखले आहेत. उदाहरणार्थं श्रीरंगम् येथील मूर्तीचित्रात प्रचलित असलेल्या दोन कथा साउथ इंडिया अँड हुर मुहम्मदन इनव्हेवर्स या पुस्तकांत दिल्या असून एकींत तर श्रीरंगम् च्या मूर्तीने सुमारे ६० वर्षे वनवासांत काढल्यावर तिची पुनः पूर्वीच्या ठिकाणी स्थापना झाली असे सांगितले आहे. (पृ. ११२–११६, १५७-१६४). या वनवासाच्या काळाबाबत अतिशयोक्ति असण्याचा संभव आहे परंतू परचक्राचे वेळीं सुरक्षिततेसाठीं अशा तऱ्हेनें मूर्ति हलविणें शक्य आहे. ५ अ. राज शक ३५ माघ वद्य ५, बुधवार (इ. १७०९ जानेवारी १९) या मितीस पहिले शाहू छत्रपतींनी दिलेल्या एका सनदेची एक नक्कल उपलब्ध आहे. त्यावरून असे दिसतें कीं, श्रीविठ्ठलाचा अभिषेक, पूजा, नैवेद्य व दिपाराधनासाठी गोपाळ विठ्ठल बडवे यांनी श्रीविठ्ठलाची पूजा सांग करावी म्हणून छत्रपति राजाराम महाराजांनी प्रत्येकी १८० पादशाही होनांचें वर्षासन दिलें होतें. त्याविषयी छत्रपती राजाराम महाराजांचे पत्र आणून दाखविल्यामुळे पहिले शाहु छत्रपतींनी सुद्धा प्रस्तुत सनद करून दिली. !! .... अमर दांगट

All reactions:
You, Mahendra Dangat, Nitin Urit and 85 others


#राज्यव्यवहारकोश
' किंवा राजकोष हा ग्रंथ आजवर रघुनाथपंडित (रघुनाथ नारायण हणमंते) यांनी रचलेला आहे असे समजले जात होते आणि त्याची रचना शिवराज्याभिषेकानंतर, इ. स. १६७७-७८ च्या सुमारास शिवाज्ञेने रघुनाथपंडितांनी केली आहे, असे मानले जात होते. परंतु अलीकडे ख्यातनाम संशोधक डॉ. माणिकराव धनपलवार यांनी या ग्रंथाचा कर्ता आणि रचनाकाळ यांचा निर्णय सप्रमाण केला आहे. या ग्रंथाचा कर्ता धुंडिराज लक्ष्मण व्यास हा असून, तो तंजावरचा राजा शहाजी ( इ. स. १६८४-१७१०) यांचा आश्रित होता. त्याने अनेक उत्तमोत्तम ग्रंथांची रचना केलेली आहे. रघुनाथपंडित हे शहाजीराजांच्या काळापासून दक्षिणेतील मराठा सत्तेचे मुत्सद्दी म्हणून वावरणारे विद्वान् होते; शिवाजीराजांनी हे कार्य त्यांच्याकडे सोपवले असले, तरी राजकीय कार्याच्या व्यवधानात त्यांना ते शक्य नसल्यामुळे, त्यांनी आपल्या संबंधातील समर्थ कविपंडिताकडे धुंडिराज व्यासांकडे त्याची जबाबदारी सोपवली. धुंडिराज व्यासाने हे जिकिरीचे कोशरचनाकार्य पुरे केले, परंतु ते शिवकाळात नव्हे, तर तंजावर नृपती शहाजीच्या राज्यकाळात, म्हणजे १६८४ नंतर केव्हा तरी या वेळी शिवछत्रपती आणि रघुनाथपंडित हे दोघेही प्रेरक पुरुष हयात नव्हते. “ इति श्री शिवच्छत्रपतिप्रियामायेन नारायणाध्वरिसूनुना रघु नाथपण्डितेन शिवराजनियोगतः कृते राजव्यवहारकोशे पण्यवर्गो दशमः समाप्तः । शके १६४७ विश्वावसौ फाल्गुन कृष्ण १४ चंद्रे समाप्तम् ।। यावरून हा ग्रंथ इ. स. १७२५ मधे लिहिला आहे हे स्पष्ट आहे. ग्रंथकाराने या दोघांविषयी रघुनाथपंडिताच्या भूमिकेतूनच गौरवापर श्लोक या ग्रंथात लिहिलेले आहेत. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांचा आणि त्यांच्या कुळांचा गौरव गाणाऱ्या या कवीने, खास कुळकीर्तीची पार्श्वभूमी उभी करण्याचा प्रसंग असूनही भोसले कुळाचा संबंध राजस्थानातील सिसोदिया रजपुतांशी असल्याचे चुकूनही सूचित केले नाही, हे आपण गंभीरपणे ध्यानीं घ्यायला हवे. ... क्रमश !! ..... अमर दांगट

All reactions:
You, Atul Dangat, Nitin Urit and 71 others

 

छत्रपती शिवरायांचा शिल्पांकित झालेला सत्य इतिहास

#मराठा आणि मल्लम्मा देसाई संघर्ष, बेलावाडी, कर्नाटक           राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी पूर्व तयारी कारून छत्रपती शिवाजी महाराज ...